आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील एक अपरिहार्य दखलपात्र नाव म्हणजे राजा ढाले (१९४०-२०१९). राजा ढाले म्हणजे प्रज्ञेचं वादळ, एक वैचारिक झंझावात. त्यांनी अनेक क्षेत्रातील प्रस्थापित चौकटी मोडल्या. मग ते क्षेत्र साहित्याचं असो, समीक्षेचं असो, सौंदर्यविज्ञानाचं असो, राजकारण, समाजकारण वा धम्मक्षेत्र असो. राजा ढाले केवळ शाब्दिक विचारवंत नव्हते तर ते कृतिशील विचारवंत होते. त्यांची वैचारिक बंडखोरी अनेक क्षेत्रात दिसून येते. मग लघुअनियतकालिकांची चळवळ असो वा आजवर त्यांनी केलेले लेखन असो वा कृती असो. विशेषतः 'सत्यकथे'ची होळी करणं असो, गीता दहन असो वा राष्ट्रध्वजावरील त्यांचा गाजलेला लेख असो. राजा ढालेंचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वटीका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा एक मार्ग म्हणून अभ्रष्ट बुद्धधम्म तिसऱ्या जगापुढे ठेवला. त्यासाठी त्यांनी बुद्धधम्मावर चढलेली परंपरेची धार्मिक पुटे बाजूला केली. विज्ञानाला आणि लोकशाहीला पूरक असा धम्माचा जो अन्वयार्थ लावला त्याचे सम्यक आकलन राजा ढाले यांनी करुन घेतले आणि आयुष्यभर त्याचा प्रसार वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून करीत राहिले. यासंदर्भातील त्यांचे 1) आधुनिक भारतीय बौद्धांवरील परकीय आक्रमण आणि 2) आधुनिक भारतीय बौद्धांचे 'धम्मा'वरील आक्रमण. हे दोन लेख अत्यंत महत्त्वाचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका बुद्धवचनाचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे; पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे' राजा ढाले याच तत्त्वानुसार शेवटपर्यंत जगले. असा त्यांचा व्यापक, प्रज्ञाधारित, प्रेरक जीवनपट थोडक्यात या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.